Wednesday, May 28, 2014

नेहरु गेले त्यावेळची गोष्ट

पाठी शेकवित बसलेली पोरे कलकलली
शहर कसे करडे होत गेले
नंतर अंजिरी
पुढे – काळोखाने माणिक गिळले.

दगडी गाऊन घातलेले कारखाने
चिरुट शिलगावित
विचारांत बुडाले.
नंतर...
ओलेच खमीस खांद्यावर टाकून
खुराड्याकडे वळले.

‘क्या हुआ ए सुंद्रे!’
- ‘आज लोबन मत जला!’…नेहरु गये!!’
‘सच, तो चलो आज छुट्टी! ...’
शीण पेलणारे जग खाटेवर कलले.

मी उदास खिन्न होऊन चाललो
रस्ते कसे भयाण वाटले
कागदी खोळीत उजेड घेऊन चाललेला हातगाडीवाला.
मी विचारले,
‘हा प्रकाश आता कशाला नेतो आहेस?’
‘वा राव; पुढे काळोख दात विचकीत असेल!’

नेहरु गेले त्यावेळची गोष्ट!

- नारायण सुर्वे

No comments:

Post a Comment