Friday, May 13, 2022

माझ्या माणसांनो,

 माझ्या माणसांनो – जयंत गडकरी


माझ्या माणसांनो,

तुम्ही काळे असाल, गोरे असाल, लाल किंवा पिवळे असाल,

कोणत्याही जातीचे, धर्माचे, देशाचे, भाषेचे असाल…

पण गर्भारपणी तुमच्या आयांच्या डोळ्यांत

सारख्याच स्वप्नांची निरांजने तेवली असतील.

प्रसुतीच्या असह्य वेणा त्यांनी

सारख्याच आशेने सहन केल्या असतील…

तुमचा बाप माझ्यासारखाच

काहीसा केविलवाणा, थोडा ओशाळवाणा,

तुमची वाट बघत बसला असेल…


तुम्ही काळे, गोरे, लाल, पिवळे असतानाही

कुठल्याही धर्माचे, देशाचे, भाषेचे असतानाही

जर सारखेच गरीब असाल, तर-

तुमच्या आईने कोरडा घास

तुम्हाला आसवांत भिजवून भरवला असेल.

पाठीवर हात फिरवताना,

बापाच्या गळ्यात आवंढा आला असेल.

तुम्हालाही माझ्यासारखंच…

खेळण्याबागडण्याचे वय संपायच्या अगोदरच

पोटाची खळगी भरण्याकरिता

बाहेर पडावं लागलं असेल.


केवळ तुम्ही कोण्या जातीचे, धर्माचे, वर्णाचे

किंवा देशाचे, प्रांताचे आहात

एवढ्याकरिता-

खोट्या आणि करंट्या अहंकाराचे बळी झाला असाल

तर तुम्हीही माझ्यासारखाच

एकमेकांचा द्वेष केला असेल.

नराधम नेत्यांच्या घोषणांनी उत्तेजित होऊन

एकमेकांची कत्तलही केली असेल.

भेकडपणाला शौर्य समजून

आपल्या सैतानी चिन्हांच्या नावाने

जयघोषही केला असेल!


माझ्या माणसांनो,

जन्माला आलात ना

तेव्हा कुणाच्याच छातीवर जानवे नव्हते.

कुणाच्याच मनगटात कडे नव्हते.

कुणालाच बाप्तिस्मा दिलेला नव्हता.

कुणाचीच सुन्ता केलेली नव्हती.

कुणाच्याच बगलेत पैशाच्या पिशव्या नव्हत्या.

कुणाच्याच काखेत भिकेची झोळी नव्हती.

जन्माला येताना – तुम्ही केलेल्या आकांताची

भाषा तर एकच होती…!


माझ्या माणसांनो,

जात, धर्म, भाषा, भेद विसरुन

जेव्हा तुम्ही प्रगतीची वाटचाल करत असाल

तेव्हा तुम्हाला भेटतील-मलाही भेटलेल्या त्याच शक्ती…

परंपरांची झूल पांघरणाऱ्या

भेदभावांची भूल घालणाऱ्या

अहंकारांचे निखारे फुलविणाऱ्या.

आणि तुम्ही जर सावध नसाल

तर शत्रुऐवजी एकमेकांचीच कत्तल कराल.


माझ्या माणसांनो,

विचारशक्तीला रजा देऊ नका.

संस्कारांचे गुलाम होऊ नका.

तुमच्यातील माणसाचा खून

सैतानालाच काय-पण तुमच्या देवालाही करु देऊ नका!


– जयंत गडकरी